नागपूर, दि. २ डिसेंबर- “जात, धर्म, पंथ व लिंग न पाहता कलाकाराला त्याच्यातील कलागुणांनुसार संधी मिळायला हवी. हाच खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. याशिवाय, या माध्यमातून स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यांना त्यांच्या कलेला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त करून देण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकेल”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
गायन, वादन, नृत्य, नाटक आणि काव्य अशा अनेकविध कलांचा संगम असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. नागपूर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे २ ते ११ डिसेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, सौ. कांचनताई गडकरी, हुंडाई मोटर्सचे पुनीत आनंद, अशोक हॉटेलचे संजय गुप्ता,किया मोटर्सच्या बिझनेस प्लॅनिंगचे एजिएम अरुण यादव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवात स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपल्या कलाविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात. यंदा उत्सवाच्या पहिल्या दिवशी १ हजार स्थानिक कलाकारांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेला ‘वंदे मातरम’ हा बहुरंगी कार्यक्रम सादर केला. महोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे.
श्री गडकरी जी म्हणाले, “महाराष्ट्र ही संत, साहित्य आणि कलाकारांची भूमी आहे. त्यांना कोणत्याही एका चौकटीत अडकून ठेवणे योग्य नाही. या महोत्सवाच्या माध्यमातूनही समाजातील सर्व घटकांमधील स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांसोबत दररोज महोत्सवाच्या सुरुवातीला १ तास स्थानिक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामुळे त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ओळखला जातो. त्याचा फायदा या स्थानिक कलाकारांना निश्चित होईल. “