यशस्वी शेतीसाठी विकासाभिमुख दृष्टिकोन, ओनरशिप आवश्यक : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, २८ नोव्हेंबर – “कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जिद्द, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ओनरशिप या गोष्टी आवश्यक आहे. मात्र, शेती करताना याचा विचार होत नाही. त्यामुळे आपल्या अन्नदाता शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा या गोष्टी अंमलात येऊन त्यादिशेने वाटचाल सुरू होईल तेव्हा शेतकरी सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -२०२२’ कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री. शरद गडाख, श्री. श्रीधरराव ठाकरे, श्री. मोरेश्वर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. गडकरीजी म्हणाले, ज्या पद्धतीने व्यवसाय हा व्यवसाय म्हणून केला जातो, यात केवळ नफा गृहीत धरला जातो. तसेच, शेतीतदेखील होणे आवश्यक आहे. आपला शेतकरी तेव्हाच सुखी, समृद्ध होईल जेव्हा तो कर्जमुक्त होईल. लोक शहराकडून गावांकडे येतील, गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ होतील. गावात २४ तास पाणी, वीज मिळेल. उत्तम रस्ता, चांगल्या वैद्यकीय सुविधा असतील. हे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे आणि जीवनात काय करायचे आहे हे आधी ठरवून घेणे आवश्यक आहे”, असे आवाहनही त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, “फायद्याच्या शेतीसाठी अभ्यास आवश्यक आहे. यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन आणि त्याचे अनुकरण हेही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, एका एकरात दोन पीक, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, मालाच्या वाहतुकीसाठी डीझेलऐवजी इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर याचाही विचार होणे आवश्यक आहे.”

श्री. गडकरीजी म्हणाले, “राज्यात ‘फार्म प्रोड्यूस कंपनी’ स्थापन झाल्यास ते शेतकऱ्यांसाठी सोईचे ठरू शकेल. त्यामुळे मालाची पॅकेजिंग, यांत्रिक मदत, भाजीपालासह इतर कृषी मालाची वाहतूक एकत्र करता येईल. त्यामुळे शेतकऱ्याला एका छताखाली सर्व सुविधा मिळतील. यामुळे त्यांचा पैसा आणि मेहनत वाचेल. यासोबतच आता ड्रायपोर्टच्या माध्यमातून कृषीमाल बाहेरील देशात निर्यात करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यासह मालाची लवकर विक्री आणि मागणीदेखील वाढेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *