नागपूर, 12 नोव्हेंबर – डिजिटल माहितीचे संग्रहण, संघटन व पुन: प्राप्तीच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ई-लायब्ररी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या डिजिटल ग्रंथालयामुळे दुर्मीळ, ऐतिहासिक ग्रंथ व हस्तलिखिते तसेच विविध स्वरूपातील साहित्य जतन करता येणे शक्य होईल. या ई-लायब्ररीच्या माध्यमातून सर्वांसाठी ज्ञानाचे भांडार खुले झाले आहे. त्याचा प्रत्येकाने पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी केले.
नागपूर सुधार प्रन्यासतर्फे मानेवाडा येथे उभारण्यात आलेल्या ई-लायब्ररीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासह केले.
ई-लायब्ररीचे काम चांगले झाले आहे. त्याबद्दल केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. या कामासाठी आणि जनतेला सुंदर अशी भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी निधी मंजूर केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सुंदर आणि अत्याधुनिक अशी ई-लायब्ररी सर्वांना मिळाली आहे, असेही केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी सांगितले.
इनोव्हेशन, आंत्रप्रिन्युअरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिस यांना ‘नॉलेज’ म्हंटले जाते. हे नॉलेज म्हणजेच वाघिणीचे दूध आहे. आयएस, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ई-लायब्ररीमार्फत मोठे ज्ञानाचे भांडार उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान बदलत आहे. प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर या तंत्रज्ञानाचा नॉलेज म्हणून वापर करत आहे. या ई-लायब्ररीचा उपयोग करून आपल्या ज्ञानाची समृद्धी वाढवून आपल्या जीवनात ते यशस्वी होतील, समाजातल्या विविध क्षेत्रात जाऊन हे विद्यार्थी काम करतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या वास्तूचे जतन करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे या सुंदर अशा वास्तूची काळजी घेण्याची विनंतीही केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी उपस्थितांना केली.