मी जनतेचा सेवेकरी : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी

नागपूर, 12 नोव्हेंबर – जात, धर्म, पंथ मी मानत नाही. असा कुठलाच भेदभाव मी करत नाही. मी जनतेचा सेवेकरी आहे आणि जनतेची सेवा करताना त्यांची जात, त्यांचा धर्म किंवा पंथ मी बघत नाही. सर्वांची साथ असेल तर हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बनावं, अशी इच्छा यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी व्यक्त केली.

हजरत बाबा ताजुद्दीन, मोठा ताजबाग दर्गा परिसरात 118.42 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत आणि मे. श्री अश्फाक अहमद असोसिएटतर्फे ही विकास कामे करण्यात आली आहेत. याप्रसंगी आमदार श्री मोहन मते जी, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे जी, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष श्री सूर्यवंशी जी, जिल्हाधिकारी बिपीन इटनकर जी, ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान जी आदी उपस्थित होते.

श्री नितीन गडकरी जी म्हणाले, हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावे सुरु होणाऱ्या रुग्णालयात आयुर्वेद, युनानी, ऍलोपॅथी, होमिओपॅथी अशा सर्व पॅथी समाविष्ट असायला हव्या. तसेच या रुग्णालयात गरिबांना, गरजुंना नि:शुल्क सेवा मिळावी. युवा वर्ग, महिला यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर काम होणे गरजेचे आहे. सरकारच्या अनेक स्किल डेव्हलपमेंट योजना आहेत, त्यांचा लाभ सर्वांनी जरुर घ्यावा. या भागाच्या विकासासाठी योजना बनवा, फडणवीस जी सेकंड फेजलाही निधी द्यायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रस्टी मंडळी आणि प्यारे खान जी यांना आपल्या पाठींब्याची गरज आहे. तेव्हा त्यांना पाठींबा द्या, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

पुढे ते म्हणाले की, बाबांच्या आशीर्वादाने जे जगत आहेत, त्यांचे जीवन अजून सुखकर व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करूया. गरिबांची सेवा करण्याची शक्ती आम्हाला मिळावी आणि गरजूंची अधिकाधिक सेवा आमच्या हातून घडावी, अशी प्रार्थना श्री नितीन गडकरी जी यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *