नागपूर – वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांचे रिवॉर्ड्सच्या स्वरुपात कौतुक करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या ट्राफिकरिवॉर्ड्स एपचे आज (शनिवार) केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी वाहनांवर लावायच्या टॅगचेही अनावरण त्यांच्या हस्ते झाले.
हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित या कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. आणि व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अख्त्यारित नागपूर महानगरपालिकेने नागपूरकरांसाठी हा प्रकल्प राबविला आहे. या माध्यमातून नियमीत वाहतुकीचे पालन करणाऱ्यांना एपच्या माध्यमातून विविध प्रकारचे रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
या एपच्या उद्घाटनानंतर मा. नितीन गडकरी म्हणाले, ‘नागपुरात मोठ्या प्रमाणात लोक या योजनेला प्रतिसाद देत आहेत, याचा आनंद होत आहे. आपण प्रायोगिक तत्वावर नागपुरात हा प्रकल्प राबवून बघितला. मात्र प्रतिसाद बघता संपूर्ण देशात याची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा विचार केला जाईल. विशेषतः महानगरांमधील सर्वसामान्य जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती व्हावी, या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी ही योजना आहे.’ देशात दरवर्षी ५ लाख अपघात होतात आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण ६० टक्के आहे, ही चिंतेची बाब आहे. कायद्याचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असते. पण वाहतुकीच्या नियमांचे नियमीत पालन करणाऱ्यांचे कौतुक केले तर कायद्याचे पालन होण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा. लि. या कंपनीने हे एप विकसित केले आहे.