मा. गडकरी यांनी केले धनुर्विद्यापटू ओजस देवतळेचे कौतुक

नागपूर – धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेच्या सलग दुसऱ्या टप्प्यात सुवर्ण पदक पटकावून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा धनिर्विद्यापटू ओजस देवतळे याच्या कामगिरीचे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी कौतुक केले.

गेल्या सहा वर्षांपासून ओजस धनुर्विद्या खेळतोय. विविध स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सुवर्ण पटकावून ओजसने हॅट्रीकच्या दिशेने वाटचाल केली आहे. ओजस तसेच त्याचे आई-वडील अर्चना व प्रवीण देवतळे यांनी ना. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ओजसने आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्याला भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘नागपुरात अनेक दमदार धनुर्विद्यापटू आहेत. या खेळाला प्रोत्साहन मिळाल्यास बहुतांश खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरसह संपूर्ण देशाची मान उंचावू शकतात,’ अशी माहिती ओजसने दिली. ओजस हा ज्योती सुरेखा वेनम हिच्यासोबत धनुर्विद्येच्या कंपाऊंड गटात खेळतो. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने शारजा येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पटकावले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुवर्ण पटकावले. मेमध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्यात कोरियासारख्या दमदार प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर नाव कोरले. ना. गडकरी यांनी जूनमध्ये होऊ घातलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यातही सुवर्ण पटकावण्यासाठी ओजसला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *