नवयूग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत
नागपूर,२६ मे : शालेय जीवनात मला मराठी साहित्याची, संगिताची गोडी लागली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो. माझ्यातील वक्तृत्व शाळेतच विकसित झाले. त्यानंतर विद्यापीठात वादविवाद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पुढे राजकीय प्रवास सुरू झाला. माझ्या या संपूर्ण जडणघडणीत शाळेतील संस्कारांचे मोठे योगदान आहे. आज मी जे काही आहे, ते शाळेतील शिकवणीमुळेच आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
महाल येथील नवयूग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ना. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी मुलाखत घेतली. नवयूग विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले ना. गडकरी यांनी शालेय जीवनातील आठणींना उजाळा दिला. ‘माझे इयत्तापाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण नवयूग विद्यालयात झाले. आम्हाला सावळापूरकर सर पसायदान शिकवायचे. मला पसायदान चांगले पाठ झाले होते. लाभे सर सुंदर हस्ताक्षराचे धडे द्यायचे. बाबा नंदनपवार सर इतिहास, महाशब्दे मॅडम इंग्रजी शिकवायच्या. दवंडे सर पीटी करून घ्यायचे. ते आमच्याकडून नियमित योगा करून घेत. त्यावेळी कोलते सर मुख्याध्यापक आणि चौथाईवाले सर उपमुख्याध्यापक होते,’ अशी आठवण ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. पारधी सरांनी सातवीपर्यंत घरी येऊन ट्युशन घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
शाळेत असताना महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांमध्ये वाचलेली प्रेरणादायी वाक्य, देशभक्तीपर गीते आजही लक्षात आहेत. ‘थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा… आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा’ किंवा ‘आम्ही मुले जरी असू फुले, तरी देशासाठी वेचू प्राण…’ यासारखी गीते आजही लक्षात आहेत, असेही ना. गडकरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेत असताना म.म. पुरंदरे. बाळशास्त्री हरदास, प्राचार्य राम शेवाळकर यांची व्याख्याने आम्ही ऐकायचो. इतिहासामध्ये, आपली संस्कृती जाणून घेण्यात विशेष रस निर्माण झाला, असेही ते म्हणाले. यावेळी नवयूग शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ना. गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राजकारण म्हणजे सेवा
राजकारणात कसे आले या प्रश्नावर ना. गडकरी म्हणाले, ‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. १९७५ मध्ये आणीबाणी लागली तेव्हा त्याविरुद्ध संघर्ष केला. १९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केला आणि राजकारणात आलो. माझ्यासाठी राजकारण म्हणजे सेवा आहे. देशाच्या हिताची कामे करणे म्हणजे राजकारण आहे.’
कोरोनाकाळात स्वयंपाकही केला
बालपणापासून कोणते छंद होते, या प्रश्नावर ना. गडकरी म्हणाले, ‘मी क्रिकेट खेळायचो. मला चांगलं संगित ऐकण्याची, नाटकं बघण्याची आवड आहे. आता वेळ मिळत नाही. मला स्वयंपाक करायलाही आवडतं. कोरोनाच्या काळात थोडाफार वेळ त्यासाठी काढला.’
नागपूरचा सर्वांगीण विकास
जगात जे काही चांगले आहे, ते आपल्या शहरात व्हायला पाहिजे, असा माझा प्रयत्न असतो. शहर सुंदर आणि स्वच्छ राहिले पाहिजे. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शहर अपघातमुक्त झाले पाहिजे यासाठी माझा आग्रह आहे आणि तसे प्रयत्नही सुरू आहेत, असेही ना. गडकरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न
– राजकारणात येण्यापूर्वी ध्येय निश्चित केले होते का?
– वकिली न करता राजकारणाकडे कसे वळलात?
– नवनवीन कल्पना कशा सुचतात?
– शाळेच्या दिवसांमध्ये नितीन गडकरी कसे होते?
– बालपणापासून कोणते छंद जोपासले?