पूर्व नागपुरातील शंभर दिव्यांगांना ई-रिक्षाचे वाटप
नागपूर, २६ मे : भारतात जवळपास एक कोटी लोक सायकल रिक्षा ओढून घाम गाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. माझ्या दृष्टीने ते एकप्रकारे त्यांचे शोषण होते. पण आज यातील ९९ टक्के लोक ई-रिक्षा चालवतात. ई-रिक्षाने गरिबांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पारडी येथील भवानी माता मंदिर परिसरात १०० दिव्यांगांना ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच दिव्यांगांना ई-रिक्षाची चावी सोपविण्यात आली. या कार्यक्रमाला पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार श्री. विकास कुंभारे, भवानी हॉस्पिटलचे संचालक श्री. पांडुरंग मेहेर, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री. गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘महाराष्ट्र हे तुकाराम महाराजांवर श्रद्धा ठेवणारे राज्य आहे. ‘जे का रंजले गांजले… त्यासि म्हणे जो आपुलें… तोचि साधु ओळखावा… देव तेथें चि जाणावा’… या महाराजांच्या ओळीवर आपला विश्वास आहे. शोषित, पीडित दलित, उपेक्षित, दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मी मानतो,’ असेही ना. गडकरी म्हणाले. ई-रिक्षाच्या माध्यमातून दिवसाला हजार ते बाराशे रुपये कमावणे शक्य आहे. या माध्यमातून कुठल्याही गरीबाला, दिव्यांगाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने चालविणे शक्य आहे, हेही त्यांनी नमूद केले. दिव्यांगांना ई-रिक्षा देण्यात कायदेशीर अडचणी होत्या. त्या अडचणी दूर करून गरीब लोकांना ही सुविधा व्हावी यासाठी प्रयत्न झाले आणि त्यात यश मिळाले. म्हणून आज आपण १०० दिव्यांगांना ई-रिक्षाचे वाटप करू शकत आहे, असेही ते म्हणाले.
आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे काम
मी विदेशात जातो तेव्हा लोक मला विचारतात की तुमच्या कारकिर्दीत तुम्ही केलेल्या कोणत्या कामाला मोठं मानता. मी एक्सप्रेस-वे किंवा उड्डाणपुलांबद्दल सांगेन असे त्यांना वाटते. पण मी गरिबांना ई-रिक्षाची सुविधा करून देणे हे माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे काम असल्याचे त्यांना सांगतो, अशी भावना ना. गडकरी यांनी व्यक्त केली.