आयएमएच्या नव्या कार्यकारिणीचे पदग्रहण
नागपूर, दि. २१ मे : नागपूरच्या डॉक्टरांनी चांगली सेवा दिल्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढलेली आहे. इथे बऱ्याच सोयी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झालेल्या आहेत. बाहेरच्या राज्यातील लोक उपचारासाठी नागपुरात येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागपूरची ओळख आता ‘हेल्थ हब’ म्हणून होऊ लागली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नवनियुक्त कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला ना. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे, आयएमए नागपूरचे संरक्षक डॉ. अशोक अढाव, नागपूर आयएमएच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. वंदना काटे आणि सचिव डॉ. कमलाकर पवार यांची उपस्थिती होती. ‘नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन सुविधा आलेल्या आहेत. इथे आता एम्सही रुग्णांच्या सेवेत आहे. आज अनेक डॉक्टर गरिबांसाठी आधार आहेत. त्यांनी समाजातील उपेक्षित लोकांची सेवा केली. त्यामुळे नागपूरकडे आशेने बघितले जाते. डॉक्टरांचे हे योगदान लक्षात ठेवण्यासारखे आहे,’ असेही ना. गडकरी यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, ‘आयएमएची परंपरा खूप मोठी आहे. अनेक प्रतिष्ठित डॉक्टरांनी आयएमएचे नेतृत्व केले आहे. अनेक वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून गरिबांचे रोगनिदान आणि त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. आयएमएची नवीन कार्यकारीणी हे काम काम नक्की करेल, याचा मला विश्वास आहे.’ मेडिकल आणि मेयोच्या इमारतीच्या विस्ताराचे काम सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
हजार रुपयांत व्हावा गरिबांचा एमआरआय
मला विशाखापट्टणम येथे मेडिकल डिव्हाईस पार्क करण्याची संधी मिळाली. तिथे अत्यंत चांगले वैज्ञानिक काम करतात. मी त्यांच्याकडून ५०० व्हेंटिलेटर्स विकत घेऊन डॉक्टरांना दिले. एकानेही तक्रार केली नाही. आता ते लोक एमआरआय मशीन तयार करत आहेत. त्यांच्याकडून ते मशीन घेऊन गरिबांना हजार रुपयांत एमआरआयची सोय करून द्यावी, अशी माझी इच्छा आहे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.