नागपूर – संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची विश्वासहार्यता हे संस्थेचे खरे भांडवल असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप सोयायटीच्या शिवाजी नगर येथील मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ना. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवाडे, निवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक, माजी आ. डॉ. परिणय फुके, धरमपेठ महिला संस्थेच्या अध्यक्ष निलिमा बावणे, उपाध्यक्ष किशोर बावणे व सारिका पेंडसे यांची उपस्थिती होती. धरमपेठ महिला संस्थेच्या प्रगतीमध्ये बावणे दाम्पत्याचे खूप मोठे योगदान असल्याचाही ना. गडकरी यांनी उल्लेख केला. ‘ज्या संस्थांमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या हितासाठी कार्य केले त्या संस्थांनी उंच शिखर गाठले आहे. धरमपेठ महिला संस्थेने आपल्या कार्यप्रणालीने हे सिद्ध केले आहे,’ असेही ना. गडकरी म्हणाले.