यांच्या जनसंपर्काला नागरिकांची गर्दी
नागपूर, दि. २१ मे: केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवारी) नागरिकांच्या अडचणी व मागण्या ऐकून घेत त्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह मोठ्या संख्येने गर्दी केली.
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मंत्री महोदयांचे आगमन झाल्यापासून त्यांच्या परत जाण्याच्या वेळेपर्यंत कार्यालय तुडुंब गर्दीने भरलेले होते. यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. अनेक विकलांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. तर काहींनी संजय गांधी निराधार योजनेच्या रकमेसंदर्भातील मुद्दा ना. गडकरी यांच्याकडे मांडला. मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या निवेदनांच्या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. देवस्थानांचा विकास व जागेच्या प्रश्नासंदर्भातील निवेदनेही त्यांनी स्वीकारली. सामाजिक, साहित्यिक, धार्मिक तसेच अध्यात्माशी संबंधित संस्थांनीही ना. गडकरी यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या. समाजाच्या सर्व थरातील महिला-पुरुष यावेळी सहभागी झाले होते.
नव्या प्रयोगांचे कौतुक
यावेळी कृषी, ऑटोमोबाईल व इतर क्षेत्रात तरुणाईने केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले. नागपूर शहरासह आसपासच्या गावांमधील तरुणांनी यावेळी संक्षिप्त स्वरुपात मांडलेले प्रयोग ना. गडकरी यांनी लक्षपूर्वक समजून घेतले व आवश्यक त्या सूचनाही केल्या.