भाऊ काणे हे क्रीडा क्षेत्रातील तपस्वी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भाऊ काणे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

नागपूर – ज्याप्रमाणे साधू-संत व्रतस्थपणे आपलं आयुष्य जगतात त्याचप्रमाणे भाऊ काणे यांनी आपले आयुष्य क्रीडा क्षेत्रासाठी आणि खेळाडूंसाठी समर्पित केले. ते क्रीडा क्षेत्रातील तपस्वी आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भाऊ काणे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : भाऊ काणे यांचा अमृत महोत्सवी सत्कार

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. भाऊ काणे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुष्पगुच्छ, मानपत्र व पगडी प्रदान करून श्री. भाऊ काणे यांचा सत्कार केला. यावेळी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे आणि आमदार प्रवीण दटके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डी नगर शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ना. गडकरी म्हणाले, ‘भाऊंचे जीवन मी जवळून बघितले आहे. त्यांनी कौटुंबिक जीवनापेक्षा खेळाडू आणि मैदानाला जास्त महत्त्व दिले. स्टेट बँकेची नोकरी सोडून पूर्णवेळ दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी आयुष्य समर्पित केले. त्यातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवले.’ भाऊ काणे यांना त्यांच्या अमुल्य अशा योगदानामुळेच महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार प्रदान केला होता, यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. शिक्षण, क्रीडा, अध्यात्म, धार्मिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये भाऊ काणे यांनी केलेल्या कार्याची दखल ना. गडकरी यांनी भाषणातून घेतली. 

आता प्रशिक्षक घडवावे

भाऊ काणे यांनी नागपुरातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले, पण आता त्यांनी प्रशिक्षक घडविण्यासाठी वेळ द्यावा, अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.    

मुलांनी मैदानावर खेळावे

नागपुरात आम्ही ३५० मैदाने तयार केली. आता शहरातील एक लाख मुले दररोज संध्याकाळी मैदानावर खेळली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असे ना. गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *