नागपूर, दि. ३० एप्रिल – गरिबी दूर करण्यासाठी रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. गुंतवणूक, उद्योग आणि उद्योजकता यात वाढ झाल्यास रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. नागपूरमधील अंबाझरी आणि तेलंगखेडी तलाव विकसित केल्याने आज पर्यटनासोबतच १० हजार जणांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय, नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योग गुंतवणूकदारांना आकर्षितदेखील करतात. त्यामुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळाल्यास देशातील उद्योगाला चालना मिळून विकसित देशाचे आपले स्वप्न साकार होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
‘टेड-एक्स अंबाझरी तलाव’ या कार्यक्रमाचे धरमपेठ येथील वनामती सभागृह येथे रविवारी (दि. ३० एप्रिल) आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशाची प्रगती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयात कमी होऊन निर्यात वाढणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा वाटा हा केवळ १२ टक्के आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. याशिवाय, उत्पादन श्रेत्राचा २२ ते २५ टक्के आणि सेवाक्षेत्राचा ५० ते ५२ टक्के आहे. ८० लाख टन बिटुमिनची आवश्यकता आहे. यापैकी ५० लाख टन बिटुमिन देशात तयार होते. तसेच ३० लाख टन आयात करावे लागते. मात्र, या ३० लाख टन बिटुमिनची गरज देशातूनच पूर्ण होऊ शकते. तनस (राईस स्ट्रॉ) यासारख्या कृषी उत्पादनापासून मोठ्या प्रमाणात बिटुमिन तयार झाल्यास आयात करण्याची गरज भासणार नाही. यामुळे अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राचा वाटा वाढण्यास मदत होणार आहे.”