नागपूर, दि. ३० एप्रिल – “देशाची प्रगती ही समाज्याच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे. यासाठी शिक्षण गरजेचे असून शिक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे येत असून देश झपाट्याने बदलत आहे. बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांत देशातील तरुण पिढी आपले कर्तृत्त्व सिद्ध करत आहेत. हीच आपली खरी संपत्ती आहे. आत्मनिर्भर भारत आणि जगातील सर्वांत मोठी अर्थ व्यवस्था बनण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान आवश्यक आहे. भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी ज्ञान आणि संशोधन गरजेचे आहे. ‘चॅलेंज द चॅलेंज’ या ग्रंथाच्या नावाप्रमाणेच नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि आव्हाने स्वीकारून प्रयत्न करत पुढे जाणारेच जीवनात यशस्वी होतात,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
प्रा. डॉ. एम. ए. विजयालक्ष्मी जी यांच्या ‘चॅलेंज द चॅलेंज’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. वर्धा रोड येथील हॉटेल ली मेरिडियन येथे रविवारी (दि. ३० एप्रिल) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी प्रा. डॉ. एम. ए. विजयालक्ष्मी यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “विज्ञान क्षेत्रातील संशोधन कार्यात प्रा. डॉ. विजयालक्ष्मी जी यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या कार्याची दखल देशातूनच नाही तर देशाबाहेर देखील घेण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन त्यासाठी केलेल्या संघर्षातूनच आज त्या यशस्वी झाल्या आहेत. मात्र, काही लोक संकटांचं रूपांतर संधीत करतात, तर काही लोक संधी मिळाल्यावर त्यातून अडचणी निर्माण करतात. आयुष्य हे आव्हान, संधी, संकटे, विरोधाभास आणि मर्यादा यांचे एकत्रीकरण आहे. प्रत्येक क्षेत्रात आव्हाने आहेत. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने ही आव्हाने स्वीकारून पुढे जात राहायला हवे. शिक्षण ही आपल्या देशाची ताकद आहे. आपल्याला विकास साधण्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे. डॉ. विजयालक्ष्मी यांनी केलेले संशोधन खूप मार्गदर्शक आहे. कारण आपण आता माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात प्रगती साधत आहोत. तसेच मेडिकल सायन्स, आरोग्य सेवा यातही आपण आघाडीवर आहोत आणि लोकांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. सुयोग्य तंत्रज्ञान वापरून आपण संपूर्ण जगाचे नेतृत्त्व करू शकतो. दरम्यान, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना ‘चॅलेंज द चॅलेंज’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.”