फायदेशीर व्यवसायासाठी काळानुरूप बदल आवश्यक – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २९ एप्रिल – “लाकूड व्यवसाय हा देशातील सर्वांत जुन्या व्यवसायांपैकी एक आहे. मात्र, यात कालानुरूप होणाऱ्या बदलांचे प्रमाण कमी आहे. कुठलाही व्यवसाय वाढवायचा असल्यास त्यात काळानुरूप बदल करत राहणे आवश्यक आहे. तेव्हाच तो यशस्वी होतो. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नवनवीन संशोधनाची जोड मिळाल्यास व्यवसायिकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय, लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यासह शेतकऱ्यांना झाडे लागवडीसाठी प्रोत्साहित करून ते खरेदी केल्यास लाकडाचा प्रश्न सुटण्यासह शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

दि नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम नागपूरमधील लक्कडगंज येथील टिंबर भवन येथे शनिवारी (दि. २९ एप्रिल) पार पडला. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी आमदार श्री कृष्णाजी खोपडे, महाराष्ट्र टिंबर लघुउद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री प्रभुदासजी पटेल, नागपूर टिंबर असोसिएशनचे अध्यक्ष श्री दिनेशजी पटेल, श्री मनोजजी चापले, श्री विनोदजी गोयंका, श्री मनोहररावजी ढोबळे,श्री प्रभुदासजी पटेल, श्री भारतभूषणजी कोहली, श्री विनोदजी पटेल, श्री दिनेशजी मनीलालभाई पटेल यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “महाराष्ट्रात मी लहानाचा मोठा झालो आहे. विदर्भ ही माझी कार्यभूमी आहे, नागपूर ही माझी जन्मभूमी आहे, तसेच नागपूर हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे मी कोणत्याही पदावर असलो तरी छोट्यातील छोट्या व्यक्तीशी माझी बांधिलकी राहील. कारण आज मी जे काही आहे, ते नागपूरच्या प्रेमामुळेच आहे.”

“चीनची बांबूवर आधारित अर्थव्यवस्था २ लाख कोटींची आहे. बांबूपासून अनेक बहुउपयोगी वस्तूंची निर्मिती होते. भारतातही कापड, लोणचे, फर्निचर तसेच आता बांधकामासाठी देखील याचा वापर होत आहे. पूर्वी उदबत्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूच्या काड्या चीनमधून आयात होत होत्या. ‘एमएसएमइ’ विभागाचा मंत्री झाल्यानंतर चीनमधून होणारी आयात बंद करून स्थानिक बांबूला प्राधान्य देण्यात आले. आज नागपूरमधील उदबत्ती व्यावसायिकांकडून आसाम येथून उदबत्तीच्या काड्यांसाठी लागणारा बांबू आणला जात आहे. यामुळे त्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढले आहे. मुंबईत जहाजाने येणारा माल ड्रायपोर्टवर येणार आहे. तसेच स्थानिक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचा माल ड्रायपोर्टच्या माध्यमातून निर्यात होणार आहे. ड्रायपोर्टमुळे उद्योगांची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे. भविष्यात लॉजिस्टिक कॉस्ट १६ वरून ९ टक्क्यांपर्यंत आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे हे लवकरच साध्य होऊ शकेल. पेट्रोल, डिझेलला पर्याय असलेल्या इथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनाचा वापर झाल्यास इंधनावरील खर्च कमी होणार आहे. तसेच बांबू हा लाकडला चांगला पर्याय ठरू शकेल. शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्याची खरेदी केल्यास फर्निचर व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. बांबूसोबतच फर्निचरसाठी आवश्यक झाडांची लागवड करण्यास प्रोत्साहन दिल्यास लाकडाचा प्रश्न सुटणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *