नागपूर, दि. २७ एप्रिल – “नागपूर तसेच विदर्भातील कर्करोग रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात जावे लागते. उपचार खर्च, दूरचा प्रवास आणि मुंबईत राहण्याची सोय नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. मात्र, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांची सुविधा होणार असून रुग्णांसाठी हा मोठा दिलासा आहे. मुंबईतील रुग्णालयांत मिळणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा आणि उपचार आता नागपूरमध्येच रुग्णांना मिळणार आहेत. त्यामुळे हे रुग्णालय कॅन्सर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे गुरुवारी (२७ एप्रिल) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी लोकार्पण केले. या वेळी नागपूर येथील जामठा येथे आयोजित या कार्यक्रमात श्री गडकरीजी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष श्री सुनीलजी मनोहर, उपाध्यक्ष श्री अजयजी संचेती, श्री शैलेशजी जोगळेकर, कोषाध्यक्ष श्री आनंदीजी औरंगाबादकर, डॉ. श्री आनंदजी पाठक, श्री ललितजी टेकचंदानी यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यामुळेच अमेरिकेत आज ३३ टक्क्यांनी कर्करोग रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विदर्भासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यांच्या विदर्भाला लागून असलेल्या भागातील कर्करोग रुग्णांसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मोठा आधार ठरणार आहे. त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात मिळणाऱ्या कर्करोग तपासणी आणि उपचार सुविधा येथे मिळणार आहे. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार मिळाल्याने या आजारातून पूर्णतः बरे होण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा रुग्णालयांमुळे कॅन्सरमुक्त भारताचे आपले स्वप्न साकार होणार आहे. त्यादृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.”