‘राष्ट्रीय वयोश्री’मुळे दिव्यांगांच्या जीवनातील असहाय्यता दूर : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १५ एप्रिल – “राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत आतापर्यंत ४० हजार दिव्यांगांना विविध साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. कामठी तालुक्यातील जवळपास १ हजार ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना आज साहित्य वाटप करण्यात आले आहे. या उपकरणांमुळे त्यांच्या जीवनमानात मोठा सकारात्मक बदल दिसून येणार आहे. याशिवाय, त्यांना समाज्याच्या मुख्य प्रवाहात येऊन छोट्या-मोठ्या व्यवसायाद्वारे सन्मानाने स्वावलंबी जीवन जगता येणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत उत्तर-पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण भागांतील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना श्री गडकरीजी यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५ एप्रिल) मोफत उपकरणे व साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, अलिम्को-कानपूर, पुनर्वसन आणि दिव्यांगजन सशक्तिकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्री कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मुक्ताताई, आमदार श्री टेकचंद सावरकर, आमदार श्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी श्री विपिन ईटणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोम्या शर्मा, समाज कल्याण अधिकारी श्री नारनवरे, उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “आर्टिफिशियल पाय मिळाल्याने ज्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे अशा नागरिकांना नागपूर महापालिकेच्या मदतीने ई-रिक्षा देण्यात येणार आहे. ज्यामुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या जीवनातील असहाय्यता दूर होणार आहे. नागपूर ग्रामीणमधील ६९७९ लाभार्थी यासाठी पात्र ठरले होते. नागपूर ग्रामीणमधील १३ तालुक्यांमध्ये ६९७९ लाभार्थी पात्र ठरले होते. त्यांना ६ कोटी २३ लाख रुपयांच्या ३५ हजार उपकरणांचे वाटप करण्यात आले. कामठी तालुक्यातील ९६४ लाभार्थी आहेत. त्यांना ९४ लाख रुपये किमतीची सुमारे ६ हजार उपकरणे वाटप करण्यात आले. यात तीन चाकी सायकल (हात चालवणारी), व्हील चेअर, चालण्याची काठी, डिजिटल श्रवणयंत्र, सहाय्यक उपकरणे, स्क्रीन रीडिंग, अंध स्मार्ट फोन, ब्रेल छडी (फोल्डिंग केन), कृत्रिम हात व पायासह इतर ४३ प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *