लोकप्रतिनिधी या नात्याने मिहानमध्ये २ लाख रोजगार निर्माण करण्याचा संकल्प – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १३ एप्रिल – “ऑरेंज सिटी, टायगर कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे नागपूर देशातील पहिले शहर आहे. तसेच खाली रस्ता त्यावर उड्डाणपूल सगळ्यात वर मेट्रो मार्ग असलेला डबल डेकर पुलाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा देखील विचार आहे. मिहान आमच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. खासदार या नात्याने मिहानमध्ये २ लाख रोजगार निर्माण होतील असा आमचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथील मिहानमध्ये आयोजित कार्यक्रमात श्री गडकरी जी यांच्या हस्ते ‘टेक महिंद्रा डिजिटल डिलिव्हरी सिस्टम’चे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, श्री सी. पी. गुर्हाणीं जी यांच्यासह इतर मान्यवर आणि टेक महिंद्रा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘टेक महिंद्रा’चे मोठे योगदान आहे. संपूर्ण जगभरात ‘टेक महिंद्रा’चे मोठे नाव आहे; तसेच ‘टेक महिंद्रा’च्या जगभरात अनेक शाखादेखील आहेत. देशातील सॉफ्टवेअर इंजिनिअर यांना जगात मोठा मान आहे. हे आपल्याकडील ‘टेक महिंद्रा’ यासारख्या उद्योगामुळे शक्य झाल्याचे सांगत त्यांनी ‘टेक महिंद्रा’ स्थानिकांना रोजगार प्रदान करत असल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. आयटी क्षेत्रात नागपूर येथे संधी निर्माण झाल्यास अनेक विस्थापित नागरिक पुन्हा आपल्या शहरात येतील, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या २४ तास वीज, पाणी आणि दळणवळण सुविधा नागपूरमध्ये उपलब्ध आहेत. देशाचे केंद्रस्थान तसेच ड्रायपोर्ट आणि वर्धा येथील लॉजिस्टिक पार्क यामुळे देशाबाहेर आयात व निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रचंड क्षमता नागपूरमध्ये आहे. विदर्भातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये एकसूत्रता राहण्यासाठी आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये समन्वय आवश्यक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *