नागपूर, दि. ८ एप्रिल – “योगाभ्यासी मंडळामार्फत २८ वर्षे जनार्दन स्वामीजी यांनी योगविज्ञानाचा प्रसार केला. स्वामीजी यांच्या सान्निध्यात तयार होऊन रामभाऊ खांडवे गुरुजी यांनी योगविज्ञानाचा प्रसार करून या कार्याचे रूपांतर आज वटवृक्षात केले आहे. योगाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटावे, सर्वांनाच याचा फायदा व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व भाषेत तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची गरज आहे. योगामुळे फायदा झालेल्या रुग्णांच्या अनुभवांवर संशोधन करून ते पुस्तक रूपात प्रकाशित केल्यास त्याला निश्चित वैज्ञानिक मान्यता मिळेल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथील ब्लाइंड रिलीफ असोसिएशन येथे आयोजित कार्यक्रमात रामभाऊ खांडवे गुरुजी यांच्या अनुभवातून प्रकाशित झालेले ‘अनुभव सिद्ध योगोपचार’ पुस्तकाचे प्रकाशन श्री गडकरीजी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ८ एप्रिल) झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री मधुसुधन पेन्नार, जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री रामभाऊ खांडवे गुरुजी, सरस्वती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक श्री महेश एलकुंचवार, योगदर्शनाचे प्रवचनकार श्री हर्षित आंबेकर, सौ. कांचन गडकरी, डॉ. श्री अनिरुद्ध गुंजलवार यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, ” जनार्दन स्वामीजी यांनी आपले संपूर्ण जीवन निरपेक्ष भावनेने समाजाला अर्पण केले. त्यांनी अतिशय कठीण काळात या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. आदर व मान्यता प्राप्त नसतानाही तपस्येच्या आधारे त्यांनी त्यांच्या कार्याचा सातत्याने प्रचार केला. स्वामीजी आज हयात नसतानाही कृतिशील योग विज्ञानाचे त्यांनी प्रत्यक्ष घडवलेले उदाहरण सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील. आज तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्याचा वापर करून योगविज्ञानाचा प्रसार जगाच्या कानाकोपऱ्यात होऊ शकेल. जगात योगाला मान्यता प्राप्त आहे. भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास आणि वारसा याचे जगाला आकर्षण आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून स्वामीजी यांचे कार्य जगभरात पोहोचवणे ही स्वामीजींसाठी खरी आदरांजली ठरेल.”