नागपूर, दि. २ एप्रिल – “नावीन्य, उद्योजकता, विज्ञान आणि संशोधनातून तयार होणारे नवनवीन तंत्रज्ञान हे देशाचे भविष्य आहे. त्यासोबतच ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत झाल्यास भविष्य उज्ज्वल आहे. गरजेवर आधारित संशोधन, सुयोग्य नेतृत्व, तंत्रज्ञान यांच्या आधारे आपण निरुपयोगी गोष्टींना देखील समृद्धीत परावर्तित करू शकतो. दिल्लीत २० लाख टन कचऱ्याचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याने गाझीपूर येथील कचऱ्याचा डोंगर २० मीटरने कमी झाला आहे. त्यानुसार येत्या २ वर्षांत कचऱ्याच्या टेकड्या भुईसपाट करून दिल्लीला कचऱ्यापासून मुक्तता मिळवून देण्याचा संकल्प आहे. मोठ्या प्रमाणात गुंवणूकीसाठी पीपीपीमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. ‘वेस्ट टू वेल्थ’मध्ये संशोधन आणि तंत्रज्ञान तयार झाल्यास भविष्यात आपण खूप काही करू शकतो. प्लास्टिकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्रूड पेट्रोल तयार झाल्यास पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच प्लास्टिकचा देखील प्रश्न सुटेल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले.
इंडियन वूमेन सायंटिस्ट असोसिएशनद्वारे नागपूर येथील निरी सभागृहात ‘वाईज – २३’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशाला ८० लाख टन बिट्यूमिन लागते. तेच तनसापासून मोठ्या प्रमाणात बायोबिट्यूमिन तयार झाल्यास ही गरज काही प्रमाणात पूर्ण होईल. इंडियन रिफायनरीमधून ५० लाख टन बायोबिट्यूमिन उपलब्ध होते, तर ३० लाख टन आयात करण्यात येते. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांपासून ते तयार झाल्यास आयात करण्याचीदेखील गरज भासणार नाही. पडिक जमिनीवर बांबू लागवड केल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यासह पर्यावणरपूरक इंधन निर्मितीस प्रोत्साहन मिळेल. बांबूच्या कोणत्या जाती लावल्यास ग्रामीण भागाचे चित्र बदलू शकते, पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते, हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी गरजेनुरुप आणि प्रदेशनिहाय संशोधन ही काळाची गरज आहे. तसेच गुणवत्तेमध्ये तडजोड न करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन करणे आवश्यक आहे. ऊर्जा क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्या आधारित कृषी क्षेत्रात विविध प्रयोग होणे आवश्यक आहेत. त्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होऊ शकतो. असे झाल्यास कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकेल.”