इंदोरा चौक ते दिघोरी चौक पूल नागपूरची लाईफलाईन बनेल! : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १ एप्रिल – “पूर्व आणि मध्य नागपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळ मला जवळून माहिती आहे. येथील छोट्यातील छोट्या समस्येचीदेखील जाण आहे. त्यामुळेच या भागात विकास कामे झाल्यास मला अत्यंत आनंद होतो. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आज अनेक विकास कामे येथे सुरू आहेत. दाट लोकवस्ती आणि नागरी भागामुळे या भागातील विकासकामात अनेक अडचणी आहेत. मात्र, लोकांच्या सहकार्यामुळे मोमीनपुरा येथे उड्डाणपूल उभा राहत आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर मोमीनपुरा ते कामठीपुरादरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतुकीच्या बऱ्याच समस्या सुटणार आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर शहरातील इंदोरा ते दिघोरी चौक या नवीन उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम शनिवारी (दि. १ एप्रिल) गोळीबार चौक आणि सक्करदरा चौक येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार श्री कृपाल तुमाने जी, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री विकास कुंभारे, आमदार श्री प्रवीण दटके, आमदार श्री कृष्णा खोपडे, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, माजी खासदार श्री विकास महात्मे, माजी आमदार श्री अशोकराव मानकर, माजी आमदार श्री गिरीश व्यास आदी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “उत्तर, मध्य, पूर्व आणि दक्षिण नागपूरला जोडणारा इंदोरा ते दिघोरी चौक पूल हा शहराची लाईफलाईन ठरणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी कुठलेही अतिरिक्त भूसंपादन करण्यात येणार नाही. या पुलामुळे बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांचेदेखील पुनर्वसन करण्यात येणार आहे. मलेशिया येथील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने १६०० कोटींचा पूल १००० कोटी रुपयांत तयार होणार आहे. त्यामुळे कमी खर्चात पुलाचे काम चांगल्या गुणवत्तेचे होणार आहे. ‘युएचपीएफआरसी’ (अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट) या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठे पिलर प्रस्तावित केले आहे. हा पूल दाट वस्तीमधून जात असल्याने दोन पिलरमधील अंतर ६० मीटर असणार आहे. तसेच, डागा हॉस्पिटलजवळ चढण्या व उतरण्यासाठी रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय, अग्रसेन चौकात खाली रस्ता, त्याच्यावर सदर पूल आणि त्यावर मेट्रो मार्ग असणार आहे. ३ प्रमुख जंक्शन आणि ११ लहान जंक्शन्सही विकसित करण्यात येणार आहेत.

वाहतुकीवरील ताण कमी होणार

श्री गडकरीजी म्हणाले, “इंदोरा ते दिघोरी चौक हा उड्डाणपूल कामठी रोडवरील इंदोरा चौकापासून सुरू होऊन दिघोरी चौकापर्यंत असणार आहे. हा संपूर्ण भाग दाट लोकवस्तीचा व व्यावसायिक आस्थापने, दुकाने, स्थानिक बाजार या परिसरात आहे. त्यामुळे या परिसरात दुचाकी-चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांसह ऑटोरिक्षा आणि पादचारी यांची कायम वर्दळ असते. या उड्डाणपूल मार्गात ३ मोठे व ११ लहान जंक्शन आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात घडतात. मात्र, प्रस्तावित उड्डाणपुलामुळे अत्यंत दाट रहदारीचा भागातून भंडारा आणि उमरेडच्या दिशेने जाणारी वाहतूक विनाअडथळा सुरू राहील. तसेच या परिसरातील वाहतूक विभागली गेल्याने येथील रस्त्यांवरील भार कमी होऊन सुरक्षित वाहतूक सुरू राहील.”

उड्डाणपुलाचे फायदे

  • उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार
  • उड्डाणपुलाच्या वापराने जंक्शनवरील अपघातांचे प्रमाण कमी होणार
  • उड्डाणपुलामुळे वेळ व इंधनात बचत होऊन शहरातील प्रदूषण नियंत्रित होणार
  • इंदोरा चौकापासून दिघोरी, उमरेड, शासकीय रुग्णालय व बस स्थानक गाठण्याच्या वेळेत होणार बचत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *