रायगड, दि. ३० मार्च – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आज मुंबई – गोवा (राष्ट्रीय महामार्ग ६६)ची राज्याचे मंत्री श्री उदयजी सामंत यांच्यासह पाहणी केली. भू-संपादन प्रक्रिया, भू-संपादन मोबदला वाटप आणि या मार्गावरील वनजमीन हस्तांतरणासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरीमुळे विलंब झालेल्या या कामास आता गती आली आहे.
इंदापूर ते झारप दरम्यानच्या या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेस (पी-९ व पी-१०)चे काम जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले आहे. तर, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेस (पी-४ व पी-८)चे अनुक्रमे ९२ टक्के व ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही पॅकेजेस (पी-६ व पी-७) साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. या दोन्ही पॅकेजेसमध्ये अनुक्रमे २५% व २७% काम झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेस (पी-२ व पी-३)चे अनुक्रमे ९३ टक्के व ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (पी-१)चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.