रायगड, दि. ३० मार्च – “पर्यावरणाचा विचार करून भविष्यातील रस्त्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शहरातून निर्माण होणार कचरा, स्टील स्लॅग, खराब टायर पावडर, रबर, प्लास्टिक याशिवाय बांबूपासून क्रॅश बॅरियर हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. देशात हा प्रयोग यशस्वीदेखील झाला आहे. देशात पेट्रोल, डिझेल वापर कमी करून इथेनॉल, इलेक्ट्रिक, मिथेनॉल, हायड्रोजन वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत असून हेच भविष्य आहे. यामुळे वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनादेखील थांबवता येणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन श्री गडकरीजी यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पळस्पे गाव येथे गुरुवारी (दि. ३० मार्च) हा कार्यक्रम पार पडला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री श्री उदय सामंत जी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण जी, खासदार श्री सुनील तटकरे जी, खासदार श्री श्रीरंग बारणे जी, आमदार श्री प्रशांत ठाकूर, आमदार श्री महेश बाल्दी, आमदार श्री रवी पाटील, आमदार आदिती तटकरे, श्री रामशेठ ठाकूर जी, माजी आमदार श्री धैर्यशील पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या. ठेकेदार बदलण्यासह प्रशासकीय उदासीनतेमुळे २००९ साली कर्नाल अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यासाठी मागितलेली परवानगी २०१६ साली मिळाली. त्यामुळेदेखील कामाला विलंब झाला. याशिवाय, भू-संपादनातही अनेक अडचणी आल्या. मात्र, आता लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत आल्यानंतर सर्व अडचणी दूर होतील. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख जणांना जीव गमवावा लागतो. जगात रस्ते अपघातात मरणाऱ्यांच्या क्रमवारीत भारत पहिल्यास्थानी आहे. यात सर्वांत जास्त १८ ते ३४ वयोगटातील आहेत. हे थांबविण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांसह सामाजिक भान राखणेदेखील आवश्यक आहे.”
“मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासासह प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. जलद वाहतुकीमुळे कृषी क्षेत्रालाही लाभ होईल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. हे प्रकल्प स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत. पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवासाचा वेग वाढून वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. जेएनपीटी व दिघी या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा हा मार्ग असल्याने जल वाहतूक विकासालादेखील चालना मिळणार आहे.
१५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा
श्री गडकरीजी यांनी यावेळी १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.