गेल्या नऊ वर्षांत ‘सीआरएफ’ फंडातून शहरात १ लाख कोटींची विकासकामे
नागपूर, दि. २५ मार्च – “नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून देणारे नागपूर हे देशातील पहिलेच शहर आहे. यामुळे पाण्यासाठी निघणारे मोर्चे आणि नागरिकांकडून येणारी निवेदने पूर्णपणे थांबली आहेत. सध्या ५० टक्के नागरिकांना याचा लाभ होत असला तरी लवकरच संपूर्ण शहराला २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. लोकार्पण होत असलेल्या दाभासह गिट्टीखदान येथील तीन जलकुंभांमुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार आहे. दरम्यान, गेल्या नऊ वर्षांत ‘सीआरएफ’ फंडातून शहरात एक लाख कोटी रुपयांची विकासकामे करण्याची संधी मिळाली. यामुळे नागरिकांना चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करून देता आल्या”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे दाभा १,२ आणि गिट्टीखदान येथे उभारण्यात आलेल्या जलकुंभांचे लोकार्पण शनिवारी (दि. २५ मार्च) श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. अनंत नगर येथील श्री हनुमान मंदिर प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी आमदार श्री विकास ठाकरे, आमदार श्री प्रविण दटके यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासह पहिला डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचा रेकॉर्ड नागपूरकरांच्या नावावर आहे. यामुळे नागपूर देशासाठी आदर्श ठरत आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, अमृत योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या जलकुंभांमुळे यावर मत करता येणार आहे. दाभासह गिट्टीखदान येथील तीन जलकुंभांमुळे या भागातील नागरिकांना सुरुवातीला साडेतीन ते चार तास पाणीपुरवठा होणार असून २ महिन्यांनंतर त्यांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहराचा पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास साध्य करणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून आपली प्राथमिकता आहे. तसेच यासाठी नागरिकांचेदेखील सहकार्य आवश्यक आहे. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण मुक्त शहरासाठी पावसाळ्यात किमान ५०० झाडे लावण्याचा संकल्प केल्यास हरित शहर झाल्याशिवाय राहणार नाही.”