Search
Close this search box.

विडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी समर्पित नेतृत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब कुंभारे

एका कायद्यामुळे १ कोटी नागरिकांचे जगणे सुलभ झाल्याचे समाधान : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २२ मार्च : “भंडारा, गोंदिया जिल्ह्यांसह कामठी येथील विडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. व्यवसायाने वकील असलेल्या दादासाहेबांनी शोषित, पीडित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष केला. दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या निर्माणातदेखील त्यांचे मोठे योगदान होते,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे बुधवारी (दि. २२ मार्च) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारण्यात आलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणार्‍या यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह आणि फूड कोर्टचे भूमिपूजन श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, भंते राहुल बोधी जी, सुलेखाताई कुंभारे जी, माजी आमदार श्री जोगेंद्र कवाडे जी, आमदार श्री टेकचंद सावरकर जी, श्री अनिल निधान जी, डॉ. श्री राजू पोतदार जी यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “आज सायकल रिक्षाची जागा इ-रिक्षाने घेतली आहे. यामुळे सायकल चालवणाऱ्यांचे जीवन सोपे झाले आहे. पूर्वी सायकल रिक्षावर एकाच वेळी चार जणांना घेऊन जावे लागत होते. ज्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त मेहनत या व्यावसायिकांना घ्यावी लागत होती. यामुळे त्यांना विविध आजारही जडायचे. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यानंतर सर्वांत आधी या सायकल रिक्षावाल्यांची यातून सुटका करण्यासाठी कायदा करून तो अंमलात आणला. आज एका कायद्यामुळे १ कोटी लोकांची यातून सुटका झाली असून त्यांचे जगणे सोपे झाले आहे.”

“भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ, त्यांनी ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तसेच त्यांचे ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले ही सर्व ठिकाणे ‘बौद्ध सर्किट’ या रस्त्याच्या माध्यमातून जोडण्याची संधी मिळाली. आज या ठिकाणांना देश-विदेशातील नागरिक भेटी देत आहेत. गौतम बुद्ध यांचे विचार भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे विचार भावी पिढीपर्यंत अधिक सोप्या पद्धतीने आणि प्रभावीपणे पोहोचवता येतील. तेव्हाच सुखी,संपन्न आणि संस्कारीत पिढी निर्माण होऊन समाजातील जातीयता, अस्पृश्यता समूळ नष्ट होईल. तसेच माणूस हा जातीने नव्हे, गुणांनी मोठा असायला हवा,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी जी यांनी केले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article