नागपूर, दि. २१ मार्च – “शंभर टक्के कार्बन न्यूट्रल भारत बनवण्याचे आपले लक्ष आहे. त्यासाठी जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर भर असून त्या दृष्टीने प्रयत्नदेखील सुरू आहेत. दरवर्षी १६ लाख कोटींच्या जीवाश्म इंधनाची आयात केली जाते. मात्र, चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने इंधनात बचत होणार असून आयातही घटणार आहे. पेट्रोल-डिझेल हद्दपार करण्याचेदेखील आपले उद्दिष्ट आहे. त्याला पर्याय म्हणून हरित इंधनाला यापुढे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायो सीएनजी, बायो डीझेल, बायो एलएनजी, हरित हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक हेच आपले भविष्य आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
जी-२० अंतर्गत नागपूर येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे आयोजित सिव्हिल 20 इंडिया 2023च्या प्रारंभ परिषदेला आज श्री गडकरीजी यांनी संबोधित केले. या वेळी C20 इंडिया चेअर माता अमृतानंदमयी जी, ICCR अध्यक्ष श्री विनय सहस्रबुद्धे जी, C20 शेर्पा श्री विजय नांबियार जी आणि इतर उच्च अधिकारी उपस्थित होते.
“वसुधैव कुटुंबकम्” हे घोषवाक्य भारताच्या G20 अध्यक्षपदाचा एक शक्तिशाली संदेश देते, हे सांगताना श्री गडकरीजी म्हणाले, “सांडपाण्यावर प्रक्रिया करून वर्षाला ३०० कोटी रुपये महसूल मिळून देणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. आज देशात ऊस, मक्का, बांबू, राईस स्ट्रॉ यापासून इथेनॉल निर्माण करण्यात येत आहे. याशिवाय, रस्ते बांधकामात कचऱ्याचा वापर होत आहे. बदलत्या काळातील वास्तव आणि देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हरित इंधनावर आधारीत वाहनांच्या निर्मितीसाठीदेखील प्रोत्साहन आपण देत आहोत. समाजाच्या तळागाळातील व्यक्ती पर्यंत विकास पोहोचवण्याचे आपले उद्दिष्ट आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांचे आयुष्य कसे शाश्वत करू शकतो, हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सामाजिक आणि आर्थिक समानता हे आपले अंतिम ध्येय आहे. जलमार्ग, हवाई मार्ग, रस्ते यांचा आपण मोठ्या प्रमाणात विकास करत आहोत. पायाभूत सुविधांशिवाय उद्योग विकसित होणार नाही. उद्योगांशिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकणार नाहीत. तसेच गरिबीही दूर होणार नाही.”