नागपूर, दि. १९ मार्च – शहरात २० ते २२ मार्चदरम्यान जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी देश-विदेशातील पाहुणे शहरात येणार असल्याने प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा शनिवारी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.
भारत जी-२० चे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष देशभरातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या बैठकांकडे लागले आहे. त्यातच नागपूरही जगाच्या नजरेत येणार आहे. यानिमित्त संपूर्ण नागपूर शहरात सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, जी-२० शिष्टमंडळाच्या आगमनानिमित्त नागपूर विमानतळ परिसरात करण्यात आलेल्या सुशोभिकरणाची पाहणी श्री गडकरीजी यांनी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तयारीबाबत सूचनाही केल्या.