नागपूर, दि. १९ मार्च – “वामनराव तेलंग यांनी ज्या लोकांसमवेत काम केले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू ज्यांनी बघितले, त्या सर्वांच्या आठवणी एकत्र करून हे सुंदर पुस्तक ‘न द्वेष्टी, न काङ्क्षति’ होय. हे पुस्तक त्यांच्या जीवनाचे एक प्रकारे वर्णनच आहे. वामनरावांच्या जीवनाचे पैलू काहींना समजले, काहींना नाही समजले; मात्र हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्याविषयीची सखोल माहिती वाचकांना नक्कीच मिळेल. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्याविषयीच्या स्मृती प्रत्यक्ष डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. वामनरावांच्या जाण्याचे दुःख आपणा सर्वांनाच आहे; पण त्यांचे विचार आणि लिखाण यांच्या रूपात ते आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या या वैचारिक स्मृती पुस्तकरूपात आज प्रकाशित झाल्या आहेत,” असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.
माधवनगर येथील पीएमजी हॉल येथे ‘न द्वेष्टी, न काङ्क्षति’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्रद्धा तेलंग, ज्येष्ठ पत्रकार श्री लक्ष्मणराव जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “साहित्याची जाण असणारे आणि साहित्याचे अध्ययन करून पत्रकारितेत त्यावर लिखाण करणारे वामनराव तेलंग यांचा साहित्यिकाचा पिंड होता. असा पिंड असतानाही त्यांनी लिहिलेले लेख, पुस्तके किंवा त्यांचे विचार यामध्ये एक प्रकारची वैचारिक कटिबद्धता होती. समाज व देशहिताच्या दृष्टीने समाजोपयोगी, लोकोपयोगी अशी कोणत्या साहित्यातून कोणती गोष्ट घ्यायला हवी, याबाबत ते परखडपणे लिहीत असत. तरुण भारत दैनिकात काम करत असताना अनेक दिग्गज संपादकांच्या तोडीस तोड देणारे लेखन त्यांनी केले.”