श्रीगुरुजी रुग्णालयाकडून सामाजिक संवेदनशीलता जपत रुग्णसेवा – केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी

नाशिक, दि. १८ मार्च – “गरिबातल्या गरीब नागरिकालाही चांगल्या आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात, कोणीही यापासून वंचित राहू नये या समाज भावनेतून श्रीगुरुजी रुग्णालयाची सुरुवात झाली. केवळ सेवेच्या भावनेतून काही समर्पित व्यक्तींकडून या कार्याला उदार अंत:करणाने मदत करण्यात येते. शिक्षण आणि स्वास्थ क्षेत्रात गरिबातल्या गरीब व्यक्तीलाही योग्य प्रकारच्या सुविधा प्राप्त व्हायला हव्या, तसेच रोजगार मिळून आर्थिकदृष्ट्या त्याच्या शाश्वततेचा विकास होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी केले.

आनंदवल्ली येथील श्रीगुरुजी रुग्णालय परिसरात आयोजित स्व. डॉ. म‌. वि. गोविलकर रुग्ण सेवा सदन लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, श्रीगुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, श्रीगुरुजी रुग्णालयाचे सचिव श्री प्रवीण गुरकुले यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

श्री गडकरी जी म्हणाले, “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात सामाजिक – आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण, सेवा, स्वास्थ्य, विकास, महिला सशक्तीकरण, स्किल डेव्हलपमेंट, आदिवासी क्षेत्रांमध्ये समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने समाजातीलच व्यक्तींनी पुढाकार घेऊन, सामाजिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन कार्य करायला हवे. हे कार्य जे सध्या करत आहेत, त्याचे परिणामही उत्तम मिळत आहेत. हेच राष्ट्रनिर्माणाचे कार्य आहे. असेच काम करणारे अनेक दवाखाने जिल्ह्यात व आपल्या राज्यात आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीगुरुजी रुग्णालय आहे.”

“बऱ्याच वेळा रोगाचे निदान झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी रोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. अर्थात जनतेला तेव्हा दवाखान्यांमध्ये येण्याची फारशी गरज पडणार नाही. रोग होऊ नये म्हणून दैनंदिन जीवनपद्धतीविषयी योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. भारतीय जीवनपद्धती मूल्याधिष्टित आहे, तसेच योगविज्ञान, आयुर्वेद, विविध पॅथी या भारतीय संस्कृतीचा भाग आहेत. याच भारतीय जीवनपद्धतीशी संबंधित असणाऱ्या उपचारपद्धती आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांच्या अनुषंगाने होणारा विकास यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *