नाशिक, दि. १८ मार्च – “भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत यांनी पक्षाचा पाया उभा केला, तर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थाने ‘जनतेचा पक्ष’ अशी ओळख मिळवून दिली. महाराष्ट्र भाजपमध्ये शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, वंचित यांना आणण्याचे श्रेय त्यांचे असून त्यांच्याच प्रयत्नांमुळे त्याकाळी पक्षाचा विस्तार झाला. गोपीनाथ मुंडे यांना शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित आणि मागासवर्गीय यांच्याविषयी संवेदना होती. त्यांच्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे ते एक मोठे नेते होते,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर-शिंगोटे येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या पुतळ्याचे शनिवारी (दि. १८ मार्च) अनावरण झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार जी, राज्याचे बंदरे व खनिज कर्म मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री श्री दादा भुसे जी, श्री राधाकृष्ण विखे पाटील जी, माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात जी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे जी, खासदार प्रीतम मुंडे जी, खासदार हेमंत गोडसे जी यांच्यासह आमदार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “गोपीनाथजी मुंडे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राजकीय आयुष्याला सुरुवात झाली. राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर त्यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळात पहिल्यादा बांधकाम मंत्री झालो. याचवेळी पुणे, मुंबई महामार्गाचे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ३६०० कोटी रुपयांचे टेंडर या रस्त्याच्या कामासाठी आले होते. मात्र, गोपीनाथजी मुंडे यांच्या समर्थनामुळे ते केवळ १६०० कोटी रुपयांत पूर्ण करू शकलो. गोपीनाथजी मुंडे यांचे कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व विलक्षण प्रभावी होते. रात्री उशिरा काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही तसेच जाऊ दिले नाही. पक्ष कामासाठी ते कायम तत्पर असत. आपल्या कार्यकर्त्यांसाठी, समर्थकांसाठी जीवाची बाजी लावणारे ते लोकनेता होते. याशिवाय, महाराष्ट्रातील मंत्री म्हणून राज्य शासनात विकासाची दृष्टी देण्यातदेखील त्यांची मोठी भूमिका होती. शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नांची जाण होती. त्यामुळे ते सतत त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांना न्याय मिळून देण्यासाठी झटत राहिले आणि ते यशस्वीरीत्या सोडवले. सत्तेत नसतानाही त्यांनी केवळ आपल्या विचारांवर विश्वास ठेवून समाजामधील तळागाळातील माणसाचा विकास करण्याचे आवाहन स्वीकारून अखंडपणे संघर्ष करत त्यांना न्याय मिळवून देत पक्षाचाही विस्तार केला.”