तरुण प्रतिभावान अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची
भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची जोड आवश्यक
नागपूर, दि. १० मार्च – “भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल आज ७.५ लाख कोटी झाली आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरा सर्वांत मोठा ऑटोमोबाईल उद्योग बनला आहे. पहिल्या स्थानी चीन, दुसऱ्या स्थानी अमेरिका, तिसऱ्या स्थानी भारत आणि चौथ्या स्थानी आता जपान आहे. हे आपल्याकडे असलेल्या तरुण प्रतिभावान मनुष्यबळाच्या जोरावरच शक्य झाले आहे. मात्र, याला भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि संशोधनाची जोड मिळाल्यास पहिले स्थान मिळवणे आपल्यासाठी अवघड नाही. यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल हे पाहणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित ‘पायाभूत सुविधांच्या विकासावरील आशिया देशातील परिस्थिती’ यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. श्री संजय बेलसरे, आयसीआयचे अध्यक्ष श्री पार्थ गंगोपाध्याय, डॉ. श्री व्ही. रामचंद्र, डॉ. श्री एच. डी. चंदेवार, अभियंता श्री मनोज कावलकर, अभियंता श्री पी. एस. पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, ” देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आपला सध्या भर आहे. त्यावरच देशाचा सर्वसमावेशक विकास अवलंबून आहे. तेव्हाच नवीन उद्योग निर्माण होऊन रोजगाराच्या संधी वाढतील आणि देशाचे दरडोई उत्पन्न वाढून गरिबी दूर करता येईल. देशाला आत्मनिर्भर भारत, जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा विकसीत होणे आवश्यक आहे. यात आपल्या येथील तरुण प्रतिभावान अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नावीन्य, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन ही यशाची गुरुकिल्ली आहे. तसेच, नवनवीन तंत्रज्ञान हे देशाचे भविष्य आहे. या ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत झाल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. सुयोग्य नेतृत्व, तंत्रज्ञान यांच्या आधारे आपण निरुपयोगी गोष्टींनाही समृद्धीत परावर्तित करू शकतो. त्यामुळे नवनवीन संशोधनाच्या आधारे भविष्यातील सशक्त, समृद्ध भारताचे स्वप्न साकार करणे अशक्य नाही.”