नागपूर, दि. ९ मार्च – “समाजातील गोरगरीब आणि वंचित घटकाला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नागपूमधील ताजबाग येथे सर्व सोयीसुविधा असलेले रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. सर्वधर्मीयांसाठी श्रध्दास्थान असलेले वाकी क्षेत्र आणि संत ताजुद्दीन बाबा यांच्याकडून समाजाला दिशा देण्याचे कार्य कायम होत राहील. याशिवाय, यापुढेदेखील समाजाचे भले करण्याची शक्ती संत ताजुद्दीन बाबा यांच्या आशीर्वादाने मिळत राहील,” असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.
वाकी येथील सर्वधर्म समभावचे प्रतिक असलेल्या संत ताजुद्दीन बाबा यांच्या ८० व्या वार्षिक उरुसाचा दि. ९ मार्च रोजी समारोप झाला. याप्रसंगी श्री गडकरीजी यांनी संत ताजुद्दीन बाबा दरगाह येथे उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. यावेळी संत ताजुद्दीन बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख श्री प्यारे खान आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.