नक्षल परिस्थितीमुळे अनेक वर्षे वंचित भागही आज विकासाच्या प्रवाहात – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २६ फेब्रुवारी – “विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याचा विकास तेथील नक्षली परिस्थितीमुळे अनेक वर्षे होऊ शकला नाही. तेथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठीदेखील झगडावे लागत होते. याशिवाय, परिसरातील नैसर्गिक हानी होऊ न देता येथील विकास करण्यात मोठ्या अडचणी होत्या. मात्र, आता येथील परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारली आहे. तेथे रस्ते, पूल तयार झाले आहे. परिसरात नैसर्गिक लोहाचे मोठे भंडार उपलब्ध आहेत. यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या राहणीमानात बदल होत आहे. तसेच नक्षल चळवळीलाही बऱ्याच प्रमाणात रोखण्यात यश आले आहे. आज येथील मोठा वर्ग नक्षल चळवळ सोडून या विकासाच्या प्रवाहात येत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेंटर येथे ‘अक्षय पात्र’द्वारे आयोजित ‘फिड फ्युचर नाऊ’ या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी आणि मेळघाटात या आदिवासी क्षेत्रांत आज १३०० एकल विद्यालय सुरू झाले आहेत. ‘ज्याठिकाणी शाळा होती; पण इमारत नव्हती. जेथे इमारत होती, तेथे शिक्षक नव्हते आणि ज्याठिकाणी या दोन्ही गोष्टी होत्या तेथे विद्यार्थी नव्हते’ अशी काहीशी परिस्थिती होती. मात्र, आज एकल विद्यालयांत १६०० शिक्षक आहेत. तेथील विद्यार्थ्यांना नखे कशी काढावी, यापासून शिकवण्याचे काम होत आहे. राज्य शासनाच्या मदतीने मुलांना शाळेतच अन्न उपलब्ध झाल्याने उपासमारीचे प्रमाण कमी झाले आहे.”

“आदिवासी भागातील गर्भवती महिला, लहान मुले यांच्यात प्रथिनांची (प्रोटीन) कमतरता आहे. प्रथिनांचा मुख्य स्रोत असलेले पदार्थ महागडे असल्यामुळे आदिवासी भागातील नागरिक यापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतीत प्रथिने असलेले पदार्थ उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. सोयाबीन हे त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय ठरू शकते. आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या सोयाबीनच्या पदार्थांना बाहेरील देशांत मोठी मागणी आहे. तेच आपल्याकडे काही भागांत मोठ्या प्रमाणात प्रथिने असलेल्या पदार्थांची गरज असताना आपण ती भागवू शकत नाहीत. त्यामुळे सोयाबीनवर संशोधन होऊन यातून खाण्यायोग्य पदार्थ तयार करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या दरात ते उपलब्ध होऊ शकतील आणि प्रथिनांची गरजही पूर्ण होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *