खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात थेट नागरिकांशी संवाद
नागपूर, दि. २६ फेब्रुवारी – नागपूरसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या आणि अडी-अडचणी तात्काळ सोडवण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या नागपूरमधील खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) ‘जनसंपर्क’चे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून श्री गडकरीजी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेत काहींवर ताबडतोप तोडगा काढला, तर काहींसाठी आवश्यक असलेली शासकीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्या सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी, समस्या लगेचच सोडवण्याच्या उद्देशाने ‘जनसंपर्क’चे आयोजन नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी पायपीटदेखील यामुळे टळत आहे. रविवारी आयोजित ‘जनसंपर्क’मध्ये समस्यांची निवेदने घेऊन वयोवृद्ध, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध प्रवर्गातील नागरिक सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयात येताच श्री गडकरीजी यांनी कार्यालयाबाहेर मंडपात थांबलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह उपस्थित इतर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुरुवातीला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत श्री गडकरीजी यांनी त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी उपस्थित इतर नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना समस्येबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
स्थानिक व राज्यस्तरावरील प्रश्न, केंद्र सरकारकडील विषय, रोजगार, अनुकंपा, आरोग्य, भरपाई, अनुदान, रस्तेबांधणी, राष्ट्रीय महामार्गाचे काम यांसह अनेक विषयांची निवेदने घेऊन नागरिक याठिकाणी येतात. त्यांच्या समस्या दूर करण्याचे व शासकीय कामांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम जनसंपर्क च्या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे.