२१० गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजबांधवांना गॅस इस्त्री, गॅस सिलिंडर व डिटर्जंट बॉटलचे वाटप
नागपूर, दि. २३ फेब्रुवारी – विद्युत इस्त्रीमुळे कपडे इस्त्रीचा खर्च वाढतो. मात्र, तेच गॅसवरील उपकरणामुळे यात बचत होऊन हा व्यवसाय करणाऱ्या धोबी समाजबांधवांचा फायदा होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात गरजू समाजबांधवांना हे उपकरण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी दिले होते. त्यानुसार श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २१० आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गॅस इस्त्री, गॅस सिलिंडर कनेक्शन व डिटर्जंट बॉटलचे श्री गडकरीजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
रेशीमबाग येथील जैन कलार समाज लॉन येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या १४७व्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास महामंडळ व म. रा. धोबी, परिट, वरठी सर्व भाषिक समाज महासंघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गडकरीजी उपस्थित होते. या वेळी आमदार श्री मोहन मते, आमदार श्री प्रवीण दटके, म. रा. धोबी, परिट, वरठी सर्व भाषिक समाज महासंघाचे अध्यक्ष श्री डी. डी. सोनटक्के, आरक्षण समन्वय समिती प्रमुख श्री आशिष कदम, श्री रुपेश मोतीकर, श्री सुनील पवार, श्री सचिन कदम, श्री दयाराम हिवरकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “श्री संत गाडगे महाराज, श्री संत गजानन महाराज, श्री संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या सर्व संतांनी विदर्भ व महाराष्ट्राला एक मोठा इतिहास दिला आहे. मात्र, नवीन पिढी या इतिहासापासून बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहे. हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तेव्हाच जागृत समाज घडेल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास थोर व्यक्तींचे चरित्र, विचार आणि शिकवण लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल.”
“थोर संतांना केवळ वंदन करून भागणार नाही, तर त्यांच्या शिकवणीनुसार अनुकरण करणेदेखील आवश्यक आहे. थोर संतांचे गुण अंगिकारणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. श्री संत गाडगे महाराज यांनी त्यांच्या काळात स्वच्छता अभियान उभारले. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. ‘टाकाऊतून समृद्धी’ हाच संदेश श्री संत गाडगे महाराज यांनी दिला होता.”
आधुनिक तंत्रज्ञानातून समृद्धी
श्री गडकरीजी म्हणाले “आतापर्यंत एका शर्टला इस्त्री करण्यासाठी इलेक्ट्रिक आणि कोळशामुळे ९० पैसे खर्च येत असे; पण आता गॅसवरील उपकरणामुळे हाच खर्च ४० पैशांवर येईल. जी व्यक्ती १० हजार रुपये महिना कमावत होती, तीच आता १८ हजार रुपये कमवू शकेल. त्यामुळे केवळ भाषणातून नाहीतर प्रत्यक्ष कृतीतून छोट्या-छोट्या कामांमधून परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे. तेव्हाच दारिद्र्य दूर होईल. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समृद्धी कशी साध्य करता येईल, याचाही विचार होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संतांच्या विचारसरणीनुसार सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन होणे आवश्यक आहे.”