तरुणांनी नोकरी मिळवण्यासोबतच देणारेही व्हावे – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १९ फेब्रुवारी – श्री अनिल सोले यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्च्यून फाउंडेशनद्वारे युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून दरवर्षी गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येते. या उपक्रमामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याचसोबत नवनवीन कल्पनांवर आधारित उद्योगांसाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. यामुळे नवीन उद्योग निर्माण होऊन रोजगाराच्या संधीही वाढतील. त्यामुळे नोकरी मागण्यासोबतच नोकरी देणारेदेखील होण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

फॉर्च्यून फाउंडेशनद्वारे सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास येथे आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार श्री अनिल सोले, श्री राजेंद्र निंभोरकर, श्री प्रभाकरराव हार्डे, माजी आमदार श्री नागो गाणार, श्री संदीप जाधव, श्री राजेश बागडी, श्री प्रभाकरराव येवले, श्री जयप्रकाश गुप्ता, श्री भोलानाथ सहारे आदी उपस्थित होते.

श्री गडकरी जी म्हणाले, “आपल्या भागाचा विकास करायचा असल्यास रोजगार निर्माण होऊन जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे गरिबी दूर होईल. तसेच त्यांचे उत्पन्न वाढून जीवनमान उंचावेल. तेव्हाच विदर्भ आणि नागपूरचा विकास होईल. दरम्यान, येत्या ३१ मार्चला इन्फोसिसच्या मिहान येथील शाखेचे उद्घाटन होणार आहे. यामुळे नागपुरातील ५ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ‘एचसीएल’मध्ये ७ हजार तरुणांची भरती करण्यात आली होती. आता येथे आणखी ३० हजार जणांना काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, आतापर्यंत मिहान येथे वेगवेगळ्या उद्योगांतून जवळपास ८८ हजार जणांना, नागपूर मेट्रोत सुमारे १३ हजार आणि एमआयडीसी बुटीबोरी येथे सुमारे ११ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र आणखी विकसीत झाल्यास रोजगाराच्या संधीही वाढतील. या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *