नागपूर, दि. १७ फेब्रुवारी – “बांधकाम क्षेत्राचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. याशिवाय, आज देशात सर्वांत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारादेखील हा व्यवसाय आहे. देशासह राज्यांना सर्वांत जास्त महसूलही येथूनच मिळतो. मात्र, संशोधनाच्या माध्यमातून गुणवत्ता टिकवून ठेऊन बांधकामावरील खर्च कसा कमी करता येईल, याचा विचार झाल्यास सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सतर्फे सिव्हिल लाईन्स येथील लेडीज क्लब मैदानावर आयोजित ‘रचना-२०२३’ प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बांधकाम क्षेत्रातील उद्योजक, संस्थांचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.
गडकरीजी म्हणाले, “देशातील गरिबी दूर करायची असल्यास सर्वांना रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग येथे निर्माण व्हायला हवेत. त्याशिवाय सर्वांच्या हाताला काम उपलब्ध होणार नाही. मात्र, बांधकाम क्षेत्रात हे साध्य करण्याची क्षमता आहे. आज देशात सर्वांत जास्त रोजगार देणारा हा उद्योग आहे. तसेच, या उद्योगातून जमा होणाऱ्या जीएसटीमुळे देशाच्या अर्थकारणालाही बळकटी मिळते. दरम्यान, स्वतःचे घर घेण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मात्र, आजच्या घरांच्या किंमती पाहिल्यास ते अनेकांना शक्य होत नाही. या घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यावर विचार होण्याची गरज आहे.”