नागपूर, दि. ४ फेब्रुवारी – “रस्त्यांचे जाळे विकसीत करण्यात आपला जगात दुसरा क्रमांक आहे. तेच दुसरीकडे देशात दरवर्षी जवळपास ५ लाख रस्ते अपघात आपल्याकडे होतात. यात दीड लाख जणांचा जीव जातो तर, ३ लाख जणांना गंभीर दुखापत होते. यानुसार पाहिले तर दरदिवशी ४०० जणांचा अपघाती मृत्यू होतो. यात सर्वांत जास्त १८ ते ३४ वयवर्षे असलेल्या तरुणांचा समावेश आहे. ही आपल्या समोरील सर्वांत मोठी समस्या आणि चिंतेचा विषय आहे. हे थांबवायचे असल्यास समाजाला याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. तेच काम जन-आक्रोश संस्थेमार्फत गेले ११ वर्षे निस्वार्थ भावनेतून व सामाजिक हिताचा विचार करून सुरू असून हे कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
जन-आक्रोश संस्था, नागपूर यांच्यातर्फे निरी येथील ऑडिटोरियम येथे आयोजित ‘रस्ता सुरक्षा आणि ध्वनी प्रदूषण’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जन-आक्रोश संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री अनिल लद्दड, डॉ. श्री लाभशेटवार, राष्ट्रीय रोड सेफ्टी कौन्सिलचे सदस्य श्री रवींद्र कासखेडीकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “शासकीय नोकरीतून उच्च अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर जन-आक्रोश संस्थेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत समाजाला जागरूक करण्याचे हाती घेतलेले हे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. नागपूरपासून सुरू झालेले हे कार्य आज संपूर्ण देशांत संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या कार्यात त्यांना मिळत असलेल्या लोकसहभागातच त्यांचे यश आहे. वाहतूक विषयक नियमांबाबत नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येते. सर्रास त्यांच्याकडून नियमांना बगल दिली जाते. यामुळे गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याबाबतीत सर्वांत आधी समाजाला जागरूक करण्याची आवश्यकता आहे आणि यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. रस्ते सुरक्षा अभियानासारखे उपक्रम समाजाला जागरूक करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याशिवाय, अनुभवी अभियंत्यांनी सर्वांत जास्त अपघात होणाऱ्या भागांचा अभ्यास करून ते थांबवण्यासाठी उपाय सुचवण्याची आवश्यकता आहे. त्यांनी समोर येत या रस्ते अपघात कमी करण्याच्या मोहिमेत सहकार्य केल्यास आणखी बळ मिळणार आहे.”