पुणे, दि. २७ जानेवारी – शिक्षणावरील खर्च म्हणजे हा देशाचे भविष्य घडवण्यासाठी केलेली गुंतवणूक असते. ‘ज्ञान’ ही २१ व्या शतकातील सर्वांत मोठी ताकत आहे. चांगल्या भविष्यासाठी ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करता आले पाहिजे. शिक्षण घेत असताना मिळालेले ज्ञान, प्रशिक्षण, प्रबोधन आणि संस्कारामुळे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुण विकसीत होतात. त्यामुळे या ज्ञानाच्या माध्यमातून श्री बालाजी विद्यापीठातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होतील आणि समाज व देशाच्या विकासासाठी चांगले योगदान देतील. आपापल्या क्षेत्रात मिळवलेल्या या ज्ञानाचा पुढे जाऊन तुमच्यासह समाज आणि देशाच्या विकासासाठी देखील मोठा फायदा होणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी युनायटेड इंडियाचे पार्टनर अँड चीफ टॅलेंट ऑफिसर श्री एस. व्ही. नाथन, श्री बालाजी विद्याठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्री जी. के. शिरुदे, डॉ. श्री बिजू जी. पिल्लई, डॉ. डिंपल सैनी, डॉ. श्री एस.बी. आगासे, डॉ. श्री अशोक जोशी, श्री शरद जोशी, श्री एस. के. झा यांच्यासह संस्थेचे पदाथाकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्री गडकरी जी म्हणाले, “चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी चांगले शिक्षक, सुसज्ज इमारत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसे झाल्यासच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. पूर्वी केवळ सरकारी शिक्षण संस्था या शिक्षण मिळवण्याचे माध्यम होत्या. मात्र, कालांतराने शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत गेला. आज खासगी विद्यापीठे आणि शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून ही गरज काही प्रमाणात पूर्ण होत आहे. तसेच समाज आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षणात गुणवत्तापूर्वक बदल होत आहेत. यामुळे समाजातही याबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, टीमवर्कसाठी ज्ञान, संपत्ती आणि सत्ता यासोबतच नम्रता, शालिनता, सर्वसमावेशकता व सहिष्णुता हे गुण महत्त्वाचे आहेत. हे नसतील तर ते यश जास्त दिवस टिकणार नाही. तसेच आपल्यासोबत काम करणाऱ्याविषयी आदर, सन्मान बाळगणाराच यशस्वी होऊ शकतो.”