नागपूर, दि. २५ जानेवारी – “शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून गणपतराव वैद्य पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर त्यांनी लहान स्तरापासून संघटना वाढवण्याचे काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर दिवाकरराव जोशी यांनी संपूर्ण विदर्भात परिषदेचे संघटन उभे केले. दरम्यानच्या काळात शिक्षक सहकारी बँकेचीही स्थापना झाली. शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्था हे या परिषदेचे मुख्य भागधारक आहेत. या सर्वांचा संबंध शासनाशी आहे. त्यामुळे शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम या चारही घटकांवर होत असतो. त्यामुळे या चारही घटकांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी ही परिषदेची आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
गांधीनगर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री प्रवीण दटके, कल्पना पांडे, श्री उल्हास फडके, श्री अरविंद गजबिये आदी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी निर्माण करण्याकरिता शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. भविष्यातील नागरिक घडवण्याच्या कामात शिक्षकांना पालक, शिक्षण संस्था यांचेही सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे. कालांतराने शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊन खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्था स्थापन झाल्या. मेडिकल, इंजिनीअरिंग महाविद्यालय आणि खासगी विद्यापीठे स्थापन होऊ लागली. शिक्षणाचा हा विस्तार होत असताना शिक्षणाची गुणवत्ता आणि त्याचा मूळ उद्देश याला तडा जाऊ नये, हा विचार ठेऊन काम सुरू होते. शिक्षक संस्था, संघटना, शिक्षण, सरकार आणि पालक यांच्या हिताच्या विचार करून शिक्षण संघटनांनी राजकारणापासून दूर राहण्याची त्यावेळी सर्वांची भूमिका होती. मात्र, काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टीचे राजनीतिकरण झाले. त्यामुळे निवडणुकीत सर्वांचे सहकार्य लागत गेले आणि त्याचा परिणाम शिक्षक संघटनांवरही होत गेला.”
“शिक्षक म्हणून काम करत असताना, समाजाची सेवा करत असताना, शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना नागपूर शिक्षक मतदारसंघातील उमेदवार श्री नागो गाणार जी यांनी कधीही तडजोड आणि भ्रष्टाचार केला नाही. शिक्षकांच्या हितासाठी टोकाची भूमिका घेण्याची गरज असताना त्यांनी कधीही मागे-पुढे पाहिले नाही. शिक्षकांवरील अन्याय कधीही सहन करू नये, तसेच त्यांना न्याय मिळून देत असताना शिक्षण संस्था टिकली आणि जगली पाहिजे, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात शिक्षण संस्था व शिक्षकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी शिक्षक आणि शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकाच्या न्याय-अधिकाराचे रक्षण, शिक्षण संस्थांचा गुणात्मक विस्तार होणे गरजेचे आहे. याशिवाय, भावी पिढी संस्कारीत करणे आणि चांगले नागरिक घडवणे हे आपले व्रत असायला हवे. या सर्व बाबींचा संतुलित विकास करून प्रामाणिक शिक्षक आमदार मिळणे, ही काळाची गरज आहे. शिक्षकांची घरे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज मिळणे याबाबतचा दृष्टिकोन श्री नागो गाणार यांच्या नेतृत्त्वाखाली विस्तृत करून तसेच सर्वंकष विचार करून यात कल्याणकारी योजनांचादेखील विचार करणे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे.”