नागपूर, दि. २२ जानेवारी – खेळामुळे मुलांमधील नेतृत्व, कर्तृत्त्व आणि व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन मिळते. ते जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना मुक्त खेळण्यासाठी सुसज्ज मैदाने उपलब्ध होणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या मदतीने येथील स्थानिक खेळाडूंसाठी सुसज्ज्ज अशी ३०० मैदाने उपलब्ध व्हावीत. यातून त्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना नागपूर इम्प्रूमेंट ट्रस्टला मैदानांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी यांच्या प्रेरणेतून नागपुरात ८ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित खासदार (संसदीय) क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माजी रेस्लर श्री ग्रेट खलीजी, बॉलिवूड गायक श्री अंकितजी तिवारी, महोत्सव समितीचे संयोजक श्री संदीपजी जोशी यांच्यासह खासदार क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “खासदार क्रीडा महोत्सवात यंदा विविध मैदानांवर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेदरम्यान ८८ वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. यावेळी त्यांच्या उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच, दिव्यांगांसाठीदेखील विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान जे दोन्ही पायांवर उभे राहू शकत नव्हते, अशा खेळाडूंनीही सहभाग घेत व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. यंदाच्या महोत्सवात जवळपास ५५ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय ५ हजार पंच, ६० हजार खेळाडू, ६६ मैदान, आयोजन समितीचे पदाधिकारी आणि नागपूरकर जनता यांचे आहे.”