नागपूर, दि. २२ जानेवारी – “दत्ताजी डिडोळकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनात अनेक विद्यार्थी घडवले. गरिबीमुळे ज्यांना शिक्षण घेता येत नव्हते अशा सर्वांचे ते आधार होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाज्याच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत केली होती. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे हे काम विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आजही अविरत सुरू आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी द्वारे गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित “विद्यार्थी विकास निधी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री प्रशांत बोकारे, श्री रवींद्र कर्वे, श्री अरुण करमरकर, श्री शरद गांगल, श्री राजू हंबर्डे, श्री भूपेंद्र शहाणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “समाजातील शोषित, पीडित तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे काम प्रत्येकाकडून होण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीदेखील आपली आहे. सामाजिक संवेदनशीलता, जाणीव आणि जबाबदारी ओळखून कार्य करत राहण्याचे संस्कार विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येत आहेत. मात्र, हे काम आणखी व्यापक प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून घडणाऱ्या प्रत्येकाने कॅटलिस्टप्रमाणे समाजातील निरनिराळ्या क्षेत्रांत काम करत राहायला पाहिजे. व्यक्तिगत जीवन सांभाळत असताना प्रत्येकाने विश्वसनीयता, प्रामाणिकपणा, सामाजिक कार्याविषयीची संवेदनशीलता आपल्या कामातून जोपासायला हवी. तेव्हाच समाजाचा विश्वास साध्य करण्यास मदत होऊ शकते. समाज्याच्या कार्यात स्वतःला जोडून मदत करण्याचे संस्कार आणि स्पिरिट हीच विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे.”