नागपूर, दि. २० जानेवारी – “फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. देशात आज सर्वांत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हा उद्योग आहे. याशिवाय, या उद्योगातून तयार होणारा माल आज जवळपास १५० देशांमध्ये निर्यात होतो. आपले ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला आयात कमी करून निर्यात वाढवण्यावर भार द्यावा लागणार आहे, आणि हे साध्य करण्याची या व्यवसायात मोठी क्षमता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील अंबाझरी रोडवरील विद्यापीठ कॅम्पस परिसरात आयोजित ‘७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्री डॉमिनिक जॉर्डन, अन्न व औषध विभागाचे आयुक्त श्री अभिमन्यू काळे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्री सुभाष चौधरी, असोसिएटेड कॅप्सूल ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष श्री अजित सिंह, फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. श्री मोंटू कुमार पटेल, श्री जयेश शिंदे, डॉ. श्री टी. व्ही. नारायणन, डॉ. श्री व्ही. जी. सोमानी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले. “देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असल्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी जगाची गरज ओळखून त्या दृष्टेने प्रयत्न करायला हवेत. याशिवाय, जास्तीत जास्त संशोधनावर भर देऊन स्वस्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल आपण कसा उपलब्ध करून देऊ शकू याचाही विचार होण्याची गरज आहे. तेव्हाच आपल्यात आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.”