उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाकडे वळणे आवश्यक – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २० जानेवारी – “शेतीसोबतच दूध उत्पादन हा जोड व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठ्या फायद्याचा ठरू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात ५० लाख आणि सांगली जिल्ह्यात ३५ लाख लिटर दूध उत्पादन होते. तेच संपूर्ण विदर्भ मिळूनही २५ लाख लिटर दूध उत्पादन होत नाही. यात वाढ होण्याची गरज आहे. तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून तो समृद्ध आणि संपन्न होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

सावनेर तालुक्यातील नंदागोमुख येथे आयोजित शंकरपट बक्षीस वितरण सोहळा आणि शेतकरी, शेतमजूर व दूध उत्पादक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्री अशोकराव मानकर, श्री अशोकराव धोटे, श्री सुधीर पारवे, श्री चरणसिंह ठाकुर, श्री रमेश मानकर, श्री सुधाकर कोहळे, श्री रमेश सिंगारी, श्री नितीन राठी यांच्यासह शेतकरी नेते आणि शेतकरी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “मधल्या काळात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शंकरपटवर बंदी आली होती. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र, त्यानंतर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली होती. मात्र, त्यानंतर कोरोना निर्बंधांमुळे याचे आयोजन करता आले नाही. परंतु, आता कुठलेही निर्बंध नसल्यामुळे यंदा त्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.”

“दूध उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या पशुखाद्यासोबतच जास्त दूध देणारे पशुदेखील गरजेचे आहेत. जोपर्यंत २० लिटर दूध देणारे जनावर शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. मात्र, ‘एम्ब्रियो ट्रान्सफर आयव्हीएफ’ या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने २ ते ३ लिटर दूध देणाऱ्या देशी पशूपासून उच्च प्रतीचे जनावर तयार करता येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे बरेचशे प्रश्न सुटण्यास मदत होईल. याशिवाय, शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानासह नॅनो युरिया, सेंद्रिय शेती याचाही शेतकऱ्यांकडून विचार होण्याची गरज आहे. आपल्याकडील ज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे हेदेखील तेवढेच आवश्यक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *