नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री गडकरी जी यांनी रविवारी (दि. १५ जानेवारी) स्पर्धास्थळी भेट देऊन स्पर्धकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.
स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन तसेच व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून या ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे आयोजनावर मर्यादा होत्या. मात्र, संसर्ग आटोक्यात आल्याने यंदा तो निर्बंधमुक्त होत असल्याने खेळाडूंमध्ये उत्साह आहे. दरम्यान, श्री गडकरीजी यांनी रविवारी नागपूर शहरातील स्पर्धा सुरू असणाऱ्या मैदानांवर जाऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा स्पर्धा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच, विवेकानंद नगर येथील इनडोअर मैदानावरील कराटे आणि रेशीमबाग मैदानावर आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना यावेळी श्री गडकरीजी यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर महिलांसाठी आयोजित स्पर्धास्थळी भेट देऊन त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. यावेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालजी उपस्थित होत्या. याशिवाय, जैन कला समाज भवन येथे ज्युडो कराटे आणि छत्रपती नगर येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामनास्थळी श्री गडकरीजी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला.