नागपूर, दि. १४ जानेवारी – “विदर्भ साहित्य संघाचा इतिहास खूप गौरवशाली आहे. आपल्या १०० वर्षांच्या इतिहासात विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार करण्याचे काम संघाने केले आहे. यातूनच नवीन साहित्यिक, कवी आणि लेखक घडले. या साहित्यिकांच्या लेखनाने समाज घडवण्याचे आणि त्याला दिशा देण्याचे काम होत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागपुरातील सीताबर्डी येथील संघाच्या सांस्कृतिक सभागृहात शनिवारी (दि. १४) हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी प्रा. श्री महेशजी एलकुंचवार, न्यायमूर्ती श्री विकासजी शिरपूरकर, श्री चंद्रशेखरजी मेश्राम, डॉ. श्री गिरीशजी गांधी, डॉ. श्री आशुतोषजी शेवाळकर, डॉ. श्री पिनाकजी दंदे यासह संघाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी संघातर्फे डॉ. श्री हरिश्चंद्रजी बोरकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
श्री गडकरीजी म्हणाले, “मराठी साहित्य, नाटक, संगीत याला खूप मोठी मान्यता आहे. हे साहित्य समृद्ध आणि संपन्न करण्यात मराठी साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या कार्यातून एक प्रकारे साहित्य विश्व निर्माण केले आहे. समाजात मराठी साहित्याबद्दल आदराची भावना आहे. मात्र, भावी पिढीचा यात खूप कमी सहभाग आहे. त्यांच्यामध्ये मराठी साहित्याबद्दल गोडी निर्माण करायची असल्यास कविता, वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धांसारखे कार्यक्रम आयोजित होण्याची गरज आहे. यामुळे त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. यातूनच संस्कारक्षम सामाजिक मन घडू शकेल. विदर्भात या क्षेत्रात काम करण्याची क्षमता असणारा खूप मोठा वर्ग आहे. मात्र त्यांना संधी मिळण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच त्यांच्यातील कर्तृत्त्व, गुणवत्ता समाजासमोर येईल आणि ही संधी विदर्भ संघासारख्या व्यासपीठातर्फे उपलब्ध होत आहे.”