नागपूर, दि. ८ जानेवारी – “बालवयापासून संघर्षमय जीवन जगत आज डॉ. श्री नारंग जी, डॉ. श्री मेठी जी, डॉ. श्री पल्निवेलू जी येथपर्यंत पाहोचले आहेत. त्यांनी ज्याप्रकारे आपल्या आयुष्याला आणि भविष्याला आकार दिला, तो इतरांसाठी प्रेरणादायी आहे. कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्यक असणारी लॅप्रोस्कोपी याविषयीचे त्यांचे संशोधन हे भारतीय आरोग्य क्षेत्रासाठी एक संपत्तीच आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील ‘असोसिएशन ऑफ मिनिमल ऍक्सेस सर्जन ऑफ इंडिया’ द्वारे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “रुग्णसेवेला प्राधान्य देत अनेक डॉक्टर्स आज समाजासमोर एक आदर्श निर्माण करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भावी पिढीने वाटचाल करणे आवश्यक आहे. जगात आज भारतीय डॉक्टरांचा मोठ्या आदराने पाहिले जाते. याच कारणामुळे आपल्या देशात आज अत्यंत उत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि सरकारनेही या आरोग्य सेवांना प्राधान्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. डॉ. पल्निवेलू यांचे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्यांच्या विभागातील सर्वांना त्यांचा अभिमान आहे. सामाजिक भान, सामाजिक जागरूकता, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक संवेदनशीलता हे वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसे कमावताना आपण सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. हे सर्व गुण डॉ. पल्निवेलू यांच्यात आहेत. ते एक उत्कृष्ट सर्जन तर आहेतच; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते एक सर्वोत्तम व्यक्ती आहेत. या तिन्ही डॉक्टारांचे त्यांच्या क्षेत्रातील संशोधन, कार्य आणि आपला दृष्टिकोन युवा डॉक्टरांसाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.”