विकासाच्या प्रवाहात टिकण्यासाठी नवनवीन ज्ञान आवश्यक : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. ८ जानेवारी – समाजाचा विकास करायचा असेल तर औद्योगिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या स्वतःला घडवणे आवश्यक आहे. बदलत्या काळात परिवर्तन लक्षात घेऊन प्रगतीचा आराखडा करावा लागणार आहे. त्यानंतरच समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन उद्योजकता वाढून तरुणांना रोजगार उपलब्ध होतील आणि यातूनच समाजाचीही प्रगती होईल. याशिवाय, विकासाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी नवनवीन ज्ञान आत्मसात करत राहणेदेखील आवश्यक आहे. तेव्हाच प्रगतीचे उच्च शिखर गाठता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथील एच.एल. परवाना भवन येथे आयोजित अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “राज्य आणि केंद्र सरकारबरोबर असलेला कायदेशीर लढा अधिक प्रभावी करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाची स्थापना झाली होती. या संघर्षानंतर समाजाची अनेक प्रश्न सुटले, तर काही अद्यापही बाकी आहेत. मात्र, या लढ्यात अनेक समाजबांधवांनी मोठे योगदान दिले आहे.”

“काही निर्णयांमुळे हातमाग व्यवसाय कालांतराने संपुष्टात आला. मात्र, काही मोजक्याच नागरिकांकडून तो आजही जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात अखिल भारतीय आदिवासी हलबा समाजातील काही महिलांचा समावेश आहे. पाचगाव येथे केंद्र सरकारच्या मदतीने मी समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हातमाग युनिट सुरू केले होते. आज जवळपास १२०० महिला प्रशिक्षणपूर्ण करून येथे १० ते १२ हजार रुपये महिना उत्पन्न मिळवत आहेत. या व्यवसायाला आज मोठा प्रतिसादही मिळत आहे. असेच बेला आणि धापेवाडा येथेही युनिट सुरू करण्याचा प्रयत्न असून याचाही महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी फायदा होणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *