नागपूर, दि. ८ जानेवारी – “केवळ रस्ते, पाणी, वीज आणि उद्यान नाही तर खेळाच्या क्षेत्रातही नागपूरचे नाव पुढे नेण्याच्या उद्देशाने या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळणार आहे. पुढे जाऊन ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवतील. तसेच नागपूरचे नाव देश-विदेशात पोहोचवतील असा मला विश्वास आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी यांच्या प्रेरणेतून नागपुरात ८ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित खासदार (संसदीय) क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ओलंपियन ट्रैक अँड फील्ड ॲथलिट व भारतीय ओलंपिक संघाच्या अध्यक्ष पी.टी. उषाजी, भारतीय महिला क्रिकेट टीमच्या माजी कप्तान मितालीजी राज, भारतीय क्रिकेटर श्री उमेशजी यादव यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय आमदार श्री प्रवीणजी दटके, आमदार श्री मोहनजी मते, श्री संदीपजी जोशी यांच्यासह खासदार क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरिकही उपस्थित होते.
खासदार क्रीडा महोत्सवात १५ दिवस लहान मुलांपासून ते ८० वर्ष वयाचे ५६ हजार खेळाडू शहरातील ६२ मैदानांवर ५४ प्रकारचे खेळ आणि १२,०२० सामने खेळणार आहेत. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे.
श्री गडकरीजी म्हणाले, “गेली दोन वर्षे करोना निर्बंधांमुळे महोत्सव आयोजनावर मर्यादा होत्या. मात्र, यंदा तो मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा उत्साहदेखील वाढला आहे. महोत्सवाच्या आयोजनात अनेकांची मदत मिळाली. त्यांच्यामुळेच आज हे शक्य झाले. आज राज्य शासन आणि सेन्ट्रल रोड फंड यांच्या माध्यमातून नागपूरकरांच्या प्रतिभेला आणि त्यांच्यातील खेळाडूला प्रोच्छाहन देण्यासाठी ३०० ग्राऊंड उपलब्ध आहेत. मैदानात उपस्थित राहून नागपूरकर या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासोबतच त्यांना प्रोत्साहन देतील,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.