नागपूर, दि. ७ जानेवारी – भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांची क्षमता निश्चित मदतगार ठरू शकते. तसेच देशाच्या औद्योगिक विकासासाठी गुंतवणूक वाढवण्याविषयी विचार व्हायला हवा. तेव्हाच रोजगाराच्या संधी वाढतील आणि आर्थिक विकास साध्य करता येईल. यासाठी मजबूत टीमवर्क आणि योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील तेवढीच आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे आयोजित एक दिवसीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी देशपांडे, श्री बी. रंगनाथनजी, श्री मकरंदजी जोशी, डॉ. श्री संजयजी अरोरा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “देशाच्या भविष्यकालीन विकासासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्ससोबतच नवीन दृष्टी आवश्यक आहे. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांत आधी आयात कमी करून निर्यात वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. निर्यात वाढवण्यासाठी नवनवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. उद्योग वाढीसाठी गुंतवणूक गरजेची आहे. गुंतवणुकीसाठी उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. यालाच आपण सध्या प्राधान्य देत आहोत. तेव्हाच औद्योगिक विकास होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”